- योजनेंतर्गत कायदेशीर वारस १० लाखांच्या सानुग्रह अनुदानास पात्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२२) :- राज्य सरकारची परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली आहे. या योजनेचा सदस्य असणारा कर्मचारी १० वर्षे सेवा होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस किंवा नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास १० लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
कर्मचाऱ्याचे खाते उघडण्याची कार्यवाही लेखा विभागामार्फत केली जाणार आहे. राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अंमलात आणली आहे. नियुक्त कर्मचारी योजनेचा सदस्य होण्यास पात्र असेल. परंतु, खाते उघडण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाने पार पाडलेली नसते. कर्मचाऱ्याचा दोष नसताना काही अपरिहार्य कारणास्तव त्याचे खाते उघडले नसले तरी त्याच्या कायदेशीर वारसास १० लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देय राहील.
त्यासाठी खाते उघडण्याची कार्यवाही लेखा विभागाने करावी. सानुग्रह अनुदान मंजुरीचे अधिकार आयुक्तांना राहतील. संबंधित कार्यालय प्रमुखांनी मृताच्या कायदेशीर वारसाचा मूळ अर्ज सेवापुस्तक व मृत्यू प्रमाणपत्रासह प्रशासन विभागाकडे सादर करावा. प्रशासन विभागाने सर्व कायदेशीर बाबी तपासून आदेश जारी करावेत, लेखा विभागाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसास १० लाख सानुग्रह अनुदान देण्याची पूर्तता करावी, असे आदेशात म्हटले आहे.