- ऑटो क्लस्टर येथील कोरोना रुग्णालय कायमचे बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या ओसरल्याने नेहरूनगरच्या जम्बो रुग्णालयापाठोपाठ चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथील कोरोना रुग्णालय कायमचे बंद करण्यात येत आहे. तेथील वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य पालिकेच्या इतर रुग्णालयांत पाठविण्यात येत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑटो क्लस्टरमध्ये २०० ऑक्सिजन बेडचे तात्पुरते रूग्णालयात विक्रमी वेळेत उभारण्यात आले होते. त्यातील २० आयसीयूचे होते. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ ऑगस्ट २०२० रोजी झाले. रुग्णालयाचे संचालन स्पर्श रुग्णालयाकडे होते. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी झाल्याचे कारण देत रुग्णालय अचानक ३१ मे २०२१ ला बंद करण्यात आले तेव्हापासून रुग्णालयास टाळे होते. तिसऱ्या लाटेत शहरातील रुग्णसंख्या नगण्य झाल्याने २८ फेब्रुवारी २०२० पासून नेहरूनगरचे जम्बो रूग्णालयात बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
मार्च महिन्यात रूग्णालयाचे सर्व साहित्य पालिकेच्या रूग्णालयात पाठविण्यात आले. तर, राज्य शासनाचे साहित्य शासनाकडे पाठविण्यात आले. त्या पाठोपाठ ऑटो क्लस्टरचे रूग्णालयही कायमचे बंद करण्याचा निर्णय झाला. तेथील वैद्यकीय साहित्य, यंत्रसामुग्री व खाटा हटविण्यास सुरूवात झाली आहे. तेथील ३० व्हेटींलेटर, एक्सरे मशिन, इतर साहित्य ऑटो क्लस्टर तात्पुरत्या रुग्णालयातील साहित्य हलविताना कर्मचारी व यंत्रसामुग्री पालिकेच्या मासुळकर कॉलनी नेत्र रुग्णालयात ठेवण्यात आली आहे. तर, २०० खाटा भोसरीतील बालनगरीत ठेवण्यात आल्या आहेत. गरजेनुसार साहित्य पालिकेच्या रुग्णालयात पाठविले जाणार आहे. तेथील ऑक्सिजन प्लांटही हलविण्यात येणार आहे. पालिकेच्या रुग्णालयांना साहित्य वितरण रूग्णालयाचे सर्व साहित्य काढून घेऊन त्या हॉलचा ताबा ऑटो क्लस्टर व्यवस्थापनास देण्यात येणार आहे. तेथील सर्व वैद्यकीय साहित्य पालिकेच्या रुग्णालयात वापरले जाणार आहे. त्यामुळे त्यांची काळजीपूर्वक वाहतूक केली जात आहे, असे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.