न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२२) :- घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळा बाजार करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई चिखली येथे करण्यात आली.
दुकानमालक अजय राजेंद्र जैन (वय ३२, स. पाटीलनगर, चिखली) व कामगार सागर सुरेश तरकसे (वय २३, रा. मोरेवस्ती, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. मोरे वस्तीतील अंगणवाडी चौक येथे जय नाकोड़ा मेटल्स अँड गॅस सर्व्हिस सेंटर नावाच्या दुकानामागील मोकळ्या जागेत गॅस सिलिंडरचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली.
त्यानुसार गुरुवारी (दि. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास येथे छापा टाकला. येथे आरोपी धोकादायकरीत्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गैस सिलिंडरमधून छोट्या वापराच्या सिलिंडरमध्ये गैस रिफिलिंग करताना आढळले. या कारवाईत रोख रक्कम टाक्या व गॅस रिफिलिंग करण्याचे साहित्य असा एकूण ६६ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.