- पालिकेच्या ओबीसी माजी नगरसेवकांची माहिती विभागीय आयुक्तलयाला सादर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२२) :- ओबीसी (इतर मागास वर्ग) आरक्षणाच्या मुद्यावरून महापालिका निवडणुका लांबणीवर गेलेल्या असताना राज्य मागासवर्गीय आयोगाने ओबीसी लोकप्रतिनिधींची माहिती मागितली होती. पिंपरी – चिंचवड महापालिकेने नगरपालिका काळातील एका व महापालिकेच्या सुरुवातीच्या निवडणुकांमधील ओबीसी प्रवर्गातील नगरसेवकांची माहिती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केली आहे.
ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असल्याने तो मुद्दा राज्यात गाजत आहे. त्यासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्य मागासवर्गीय आयोगाने हाती घेतले आहे. त्यानुसार पिंपरी – चिंचवड महापालिकेकडून ओबीसीसंदर्भातील माहिती मागविण्यात आली होती. शहराची वाटचाल ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका अशी झाली. आयोगाने सन १९६० ते १९९९ या कालावधीत ओबीसी आरक्षण नसताना निवडून आलेल्या ओबीसी नगरसेवकांची माहिती मागितली आहे. एप्रिल १९७८ मध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्यावेळेस ४२ नगरसेवक होते.
महापालिकेची पहिली निवडणूक (फेब्रुवारी १९८६ मध्ये (नगरसेवक ६०) आणि दुसरी निवडणूक फेब्रुवारी १९९२ मध्ये (नगरसेवक ७८) झाली होती. नगरपालिकेच्या एका निवडणुकीत आणि महापालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ओबीसी लोकप्रतिनिधींचा शोध घेण्यात आला. त्यासाठी तत्कालीन सर्व नगरसेवकांच्या जाती संदर्भातले कागदपत्रे संकलित करून ओबीसी प्रवर्गातील नगरसेवक शोधण्यात आले. ही संख्या सुमारे दीडेशेहून अधिक आहे. आयोगासाठी संकलित केलेला हा माहितीचा अहवाल पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पालिकेने सादर केला आहे.