- वाहतूक कोंडीतून चौकाची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२२) :- निगडीतील भक्ती शक्ती उद्यानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खेळण्याचे साहित्यांचे दुकान लागले होते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर इथे गर्दी होत होती. वाहतूक कोंडीदेखील होत होती. वाहतूक पोलीस, अतिक्रमण विभाग यांनी शुक्रवारी संयुक्तपणे या दोन्ही भागातील अतिक्रमणावर कारवाई केली. कारवाईमध्ये अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे येथील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
मागील काही दिवसांत या भागात वाढलेल्या अतिक्रमणामुळे येथे वाहतक कोंडीचा त्रास होत होता. अनेक वेळा येथे अपघातदेखील होत होते. यामुळे येथील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने जात असतात. त्यातच येथे लहान मुले खेळणे खेळत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो.
त्याचबरोबर टिळक चौक येथील महाराणा प्रताप उद्यान येथे मोठ्या प्रमाणावर खाद्य पदार्थांच्या हातगाड्या लागल्या होत्या. येथे खाऊगल्लीच तयार झाली होती. यामुळे याही भागात वाहतूक कोंडीचा त्रास होत होता.