न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२२) :- पिंपरी – चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन पूर्ववेळ घेण्याचा (अपॉईंटमेंट) प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याकरिता www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पूर्ववेळ घ्यावी लागणार आहे. ७ मे रोजी होणाऱ्या शिबिरासाठी ४ मे, १४ मे रोजी होणाऱ्या शिबिरासाठी ११ मे, २१ मे रोजी होणाऱ्या शिबिरासाठी १८ मे, २८ मे रोजी होणाऱ्या शिबिरासाठी २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जदाराने पक्क्या अनुज्ञप्तीसाठी वेळेत उपस्थित राहावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.
मे २०२२ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ४ आणि ५ मे रोजी खेड, १० आणि ११ मे रोजी मंचर, १७ आणि १८ मे रोजी जुन्नर, २४ आणि २५ मार्च रोजी वडगाव मावळ आणि ३० मे रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी २ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे.