- प्रशासनाची धावपळ; प्रशासकीय कामकाजाला वेग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२२) :- ओबीसी आरक्षणाशिवाय आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. ईव्हीएम मशीनची दुरुस्ती, प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन, निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये सज्ज करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या सर्व प्रक्रियेला १० ते १५ दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीबाबत पाच महिन्यांपासून गोंधळ सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाने फेब्रुवारीच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली. ३ सदस्यांचे ४५ आणि ४ सदस्यांचा १ प्रभाग अशा एकूण १३९ जागांचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारीला प्रसिद्ध केला. या प्रभाग रचनेवर हरकती मागवून त्यावर सुनावणीही घेतली. सुनावणीचा अहवाल निवडणूक आयोगालाही पाठविला. मात्र, प्रक्रियेसाठी राज्य शासनाने निवडणुकीबाबत अधिकार स्वत:कडे घेतले. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
महापालिकेने प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी आयोगाला पाठविला आहे. तो आराखडा अंतिम होण्याची प्रतीक्षा आहे. तसेच प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम पूर्ण होत आले आहे. तसेच निवडणूक आयोगास ईव्हीएम मशीनची माहिती कळविली आहे. वाढीव प्रभागांनुसार निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सज्ज आहेत, अशी माहिती पालिकेच्या निवडणूक विभागाने दिली.