न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२२) :- पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वर्षभरात फिटनेस प्रमाणपत्र नसणाऱ्या ९०७ वाहनांवर कारवाई केली. ही कारवाई एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत करण्यात आली.
प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मालवाहतूक वाहने लांब पल्ल्याच्या मार्गावर वाहतूक करतात यात ट्रॅव्हल्स एसटी बस, ट्रक या वाहनांचा समावेश आहे. परिणामी इतरांच्या जिवालाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जीवितहानी टाळण्यासाठी अशा वाहनांची नियमित देखभाल – दुरुस्ती करणे आवश्यक आहे. योग्यता नसलेली वाहने रस्त्यावर धावत असल्याने अपघात होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांच्या फिटनेसची तपासणी केली जाते. वाहनांच्या ब्रेकपासून ते लाइट, टायर व तांत्रिक बाबींची अधिकाऱ्यांकडून पाहणी करून योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. एकंदरीत वाहन धावण्यासाठी व्यवस्थित असल्याचे योग्यता प्रमाणपत्र मिळते. वाहनांच्या फिटनेसची तपासणी आरटीओ ट्रॅकवर केली जाते. फिटनेस नसल्यास प्रतिवाहन १४ हजार रुपये दंड आकारला जातो. यासाठी प्रमाणपत्र सक्तीचे आहे. परंतु, अनेक वाहनचालक या फिटनेस प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.