न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांच्या समस्या दूर करण्यासाठी चिखली येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ आणि अपार्टमेंट महासंघ संस्था मर्यादित, पुणे यांनी हा मेळावा आयोजित केला होता. चिखली जाधववाडी येथील कोलोसस ग्रीन सिटी फेज १ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथे शाखा सुरू करण्यात आली असून तेथे हा मेळावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, पुणे शहर विभागाच्या शहर उपनिबंधक शीतल पाटील, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, तसेच संचालक सुभाष कर्णिक, अॅड. लहाने, अॅड प्रकाश तोंडारे, चारुहास कुलकर्णी, चिखली शाखाध्यक्ष आशिष सातकर आदी उपस्थित होते. अघाव व्यावसायिकाने म्हणाले की, बांधकाम गृहनिर्माण केल्यानंतर सदनिकाधारकांचे जेवढे अधिकार आहेत, तेवढीच कर्तव्ये देखील आहे. परंतु, हेच बऱ्याच जणांना माहिती नाही. सोसायटीमधील सर्वांनी एकत्रित येवून सोसायटी नोंदणी करून तसेच कन्व्हेयन्स डीड करून घ्यावे. त्यामुळे मूळ मालकाच्या नावे असलेली सोसायटीची जागा सोसायटीच्या नावे हस्तांतरित होईल.
शीतल पाटील म्हणाल्या की, सोसायट्या नोंदणीकृत होण्यासाठी शासनाने मोहीम हाती घेतली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांनी हस्तांतरण, थकबाकी, वसुली, पुनर्वसन सोसायटी नोंदणी इत्यादी कामासाठी दापोडी येथील कार्यालयात संपर्क साधावा.
सुहास पटवर्धन म्हणाले की, पिंपरी चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांच्या तक्रारीसाठी कोलासस ग्रीन सिटी फेज १ सोसायटीमध्ये सुरू केलेल्या महासंघाचे कार्यालय पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत खुले असेल.