न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०२२) :- पहिल्या पत्नीसोबत आरोपी पतीने घटस्फोट न घेता फिर्यादीसोबत विवाह केला. फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्याच्या हेतूने फिर्यादी आणि त्यांच्या आईला अकोला मध्यवर्ती बँक आणि अकोला अर्बन बँकेतून दोन लाख ३० हजार रुपये कर्ज काढण्यास भाग पाडले.
ती रक्कम पतीने स्वतःकडे घेतली. ते पैसे परत न करता फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला चाकूने मारहाण करून घरातून निघून जाण्यास भाग पाडले. फिर्यादीचा घेतलेला दोन तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस परत न करता अपहार करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना ३१ जुलै २०२० ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत पाथरूट, ता. अचलपूर, जि. अमरावती येथे घडली. विष्णू वामन ठाकरे (वय ५२) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दुसऱ्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.