- प्रांताधिकाऱ्यांच्या देहूतील बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२२) :- आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी पार पाडायची असून, त्या संदर्भात पालखी सोहळ्याचे पूर्वनियोजन करावे. तसेच, पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विविध विभागातील अधिकारी, पदाधिकारी यांनी कामांचे पूर्वनियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी संजय असवले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
श्रीसंत तुकाराम महाराज यांचा ३३७ वा पालखी सोहळा महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने वारकऱ्यांच्या विविध सोयी-सुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पूर्व नियोजन आढावा बैठक प्रांतांधिकारी संजय असवले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. १२) श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती.
यावेळी हवेलीचे अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख विशाल महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अशोक नवले, मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी अतुल गीते, अतुल माने, देह नगरपंचायतीचे प्रभारी अभियंता सचिन गायकवाड, नगरसेवक योगेश परंडवाल, योगेश काळोखे, अभिजीत मोरे, जयेश मोरे आदी उपस्थित होते.
संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त संजय मोरे, अभिजीत मोरे, जयेश मोरे यांनी पालखीत उद्भवणाऱ्या अडीअडचणी मांडल्या. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, देह-देहूरोड मार्गावरील वाहतूककोंडी, पालखी मार्गावर ठिकठिकाणी तात्पुरते स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सुविधा आणि स्वच्छतेसाठी नगरपंचायतीने पथक नियुक्ती करण्याची मागणी नितीनी महाराज मोरे यांनी केली.
श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या ३३७ व्या पालखी सोहळ्यासाठी विविध विभागातील कामांसाठी संबंधित अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार असून, त्यावर सूचना देण्यात येणार आहेत. वारी मार्गामध्ये वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर, शौचालय, स्वच्छतागृह उपलब्ध करण्यात येतील.
– संजय असवले, प्रांताधिकारी…