न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२२) :- भारत देशामध्ये तंत्रज्ञानाची सुरुवात करून भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला आधुनिक दिशा दिली असून भारतात संगणकीय युगाची सुरुवात करणारे राजीव गांधी हे द्रष्टे नेते होते, असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, महासंघाचे पदाधिकारी नितीन समगिर, मंगेश कलापुरे, उमेश बांदल, दिगंबर चिंचवडे, नंदकुमार इंदलकर, दत्तात्रय ढगे, तुषार कस्पटे, विशाल बाणेकर, जनसंपर्कचे देवेंद्र मोरे, वासिम कुरेशी यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्त घोडके म्हणाले, राजीव गांधी यांनी भारतीय प्रशासनात तंत्रज्ञानाच्या वापरास सुरुवात करून सहज व सुलभ प्रशासनाची मुहर्तमेढ रोवली. पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील ई-प्रशासनातील आघाडीची महानगरपालिका म्हणून बहुमान मिळवला आहे. तसेच राज्यशासनाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार महापालिकेला मिळाला असल्याचे ते म्हणाले. तसेच दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाचे महत्व पटवून सांगताना ते म्हणाले, वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी नागरिकांनी सजग राहून लोकशाहीची मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.