न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२२) :- तरूणाकडे परवानाधारक पिस्तुल आहे. ती तरुणाच्या कपड्यांच्या कपाटात ठेवली होती. मंगळवारी रात्री बाहेरगावी जायचे असल्याने टी शर्ट घालण्यासाठी शोधत असताना आरोपी तरुणाला टी शर्ट मिळत नसल्याने त्यानी त्याच्या आईला आवाज दिला आणि टी शर्ट शोधण्यास सांगितले.
तरुण कपाटातून त्याचा ड्रेस ओढून बाहेर काढत असताना कपड्यांवर ठेवलेले पिस्तुल खाली पडले आणि त्यातून एक गोळी झाडली गेली. ती गोळी कपाटाच्या दरवाजातून आरपार जाऊन आईच्या पायाला लागली. यात आई जखमी झाल्या आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि. २४) रात्री अकरा वाजता मिडास रेसिडेन्सी, कचरा डेपोसमोर देहूगाव येथे घडला. लता मराठे असे जखमी महिलेचे नाव आहे. \
पोलीस हवालदार किशोर दुतोंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लता यांचा मुलगा अक्षय शांताराम मराठे (वय २६, रा. मिडास रेसिडेन्सी, कचरा डेपोसमोर, देहूगाव) याच्या विरोधात इतरांच्या जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल अशी कृती केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत .