न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२२) :- महापालिकेच्या ११० प्राथमिक शाळांमध्ये ‘ ई – क्लासरूम ‘ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक देखील नियुक्त केले आहेत, अशी माहिती महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने सुरुवातीला १२ शाळांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. महापालिका शाळांमध्ये संगणक लॅब, गणिताच्या लॅब तयार करण्यात आल्या आहेत. ई – क्लासरूम या प्रकल्पासाठी प्रत्येक शाळेत ३ तज्ज्ञ मार्गदर्शक नेमण्यात आले आहेत. १३ जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना या उपक्रमातंर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांच्या कालावधीत सुरुवातीला हा उपक्रम राबविल्यानंतर त्याचे मुल्यमापन केले जाणार आहे. शिक्षकांनी प्रशिक्षित व्हावे, पायाभुत गोष्टींची माहिती करून घ्यावी, यावर या उपक्रमात विशेष भर दिला जाणार आहे. उपक्रमात काही त्रुटी राहिल्यास त्यामध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत.