- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे तत्काळ निलंबन; तर अधिकाऱ्यांची इतरत्र बदली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२२) :- खंडणी सारखा गंभीर गुन्हा देखील अदखलपात्र म्हणून दाखल केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एका सहायक उपनिरीक्षकास निलंबित केले. तर उपनिरीक्षकास दंगा काबू पथकाशी तसेच निरीक्षकाला पोलीस नियंत्रण कक्षाशी सलग्न केले. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
रामदास विश्वनाथ पाटील (वय ३४, रा. सोपान बाग कॉलनी, चिंचवडेनगर चिंचवड) यांची वाल्हेकरवाडी येथील एकविरा वाईन शॉप जवळ पानटपरी आहे. दरम्यान, आरोपी कुणाल शिवाजी डोईफोडे (२१, रा. बिजलीनगर, चिंचवड) याने रविवारी (दि. २२) पाटील यांच्याकडे दीडशे रुपयांची खंडणी मागितली. मात्र, पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने डोईफोडे याने पाटील यांना दगडाने मारहाण केली. तसेच टपरीची तोडफोड करुन फिर्यादी यांचा मोबाइल फोडला. याबाबत पाटील तक्रार देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यात गेले.
त्यावेळी तिथे उपस्थित असलेले सहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मण नरवडे यांनी खंडणीचा गुन्हा दाखल न करता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. यामुळे तक्रारदाराने थेट पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तानी चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये नरवडे यांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले. तर, पोलीस निरीक्षक किशोर पाटील आणि उपनिरीक्षक गणेश माने यांनी देखील जबाबदारीने कर्तव्य न बजावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी नरवडे यांना तडकाफडकी निलंबित केले. तर, पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांना नियंत्रण कक्ष आणि माने यांनी दूंगा काबू पथकाला संलग्न केले.