- आजपासून शाळा सुरु; प्रथमदिनी गुरुजींची शाळेत हजेरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२२) :- शहरातील खासगी व महापालिकेच्या शाळा सोमवारपासून (दि. १३) सुरू झाल्या आहेत. त्याबाबत शाळांनी विद्यार्थ्याच्या पालकांना व्हाट्सअप ग्रुपवर ऑडिओद्वारे कळविले आहे. तर महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छता, सौंदर्यीकरणाचे काम सुरू असल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बुधवारपासून बोलाविण्यात येणार असून शिक्षक मात्र, सोमवारपासून उपस्थित राहिले आहेत.
शहरातील विविध शाळांनी ढोल, ताशांच्या गजरात, गुलाबाचे फूल देऊन, चॉकलेट तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन आखले आहे. शहरातील सर्व शाळांमध्ये सोमवारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, आवश्यकतेनुसार सजावट करणे अपेक्षित आहे. तसेच, करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक प्रबोधन कार्यक्रम घेण्यात यावे, असे महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी स्पष्ट केले आहे.
तथापि, बन्याच खासगी शाळांनी सोमवारपासून शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारी पूर्ण केली होती. शाळांमध्ये स्वच्छता केली तसेच, किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. खासगी शाळांमध्ये पालकांना शाळा सुरू होण्यापूर्वीच साहित्याची खरेदी करावी लागते त्यानुसार पालकांनी शालेय साहित्याची खरेदी केली आहे. शहरातील बऱ्याच खासगी शाळांनी गणवेशाचे वाटप केलेले आहे. तर महापालिकेसह काही खासगी शाळांमध्ये अद्याप गणवेशाचे वाटप झालेले नाही.