- ‘नम्रपणे माफी मागतो’ म्हणत पत्रकार परिषद सोडण्याचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार चांदीपासून बनवलेलं पूजेच साहित्य देणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी पिंपरीत आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पत्रकार परिषदेत देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांचीही उपस्थिती होती.
देहूतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्यामुळे सर्वत्रच राष्ट्रवादीकडून विरोध होतोय. कार्यक्रमानंतर त्या वादग्रस्त विषयावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र पुन्हा या प्रकरणी प्रश्न विचारल्यामुळे नितीन महाराज पत्रकारांवर चांगलेच भडकले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद सोडून जाण्याचाही प्रयत्न केला.
यासंदर्भात बोलताना नितीन महाराज म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे भाषण ३ ते ४ वेळेस दाखवायला हवं होतं. देहू संस्थानाबाबत माध्यमांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे. वारकरी संप्रदायाला संप्रदायाच्या ठिकाणी आणि राजकारणाला राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. नको त्या गोष्टींच्या खोलात जाऊ नका.” पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर नितीन महाराज यांनी पत्रकार परिषद सोडून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना संजय महाराज मोरे यांनी समजूत काढत थांबवले. पुन्हा बोलताना ते म्हणाले “त्या गोष्टीचा संदर्भ आजच्या कार्यक्रमाला लावायचा असेल तर मी नम्रपणे माफी मागतो आणि इथून जाणं पसदं करतो. या अगोदरही सांगितलं आहे की देहू संस्थान धार्मिक क्षेत्रात काम करते. त्याला राजकारणात आणण्याचा प्रयत्न करू नये. नाही त्या गोष्टी तुम्ही पुन्हा वाढवू नका. तुम्हाला योग्य वेळी योग्य उत्तरे दिली जातील,” असे नितीन महाराज म्हणाले.