- बिल्डरला नियमबाह्य वीजभार देऊन प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक?..
- या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिका-यांना निलंबित करा – नितीन बोंडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- स्वतःच्या फायद्यासाठी महावितरणच्या देहूगाव शाखा कार्यालयातील दोन अधिका-यांनी प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. खोट्या अहवालाद्वारे नियमाची पायमल्ली करून बिल्डरला रोहित्र मारुती मंदिर क्र. ४६७६१८५ वरून वीजभार देण्यात आला आहे. संबंधित वीजधारकाकडून महावितरणची आर्थिक फसवणूक देखील झाली आहे. त्याला महावितरणचे दोन अधिकारी पाठिशी घालत असून या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य तथा शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर व विभागप्रमुख नितीन बोंडे यांनी केली आहे.
यासंदर्भात महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे येथील भोसरी विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्राधिकरण उपविभागाचे अति.कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी व देहूगावचे सहाय्यक अभियंता अनिल गौडा यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून देहूगाव माळवाडी येथील सातव यांच्या २० सदनिका असलेल्या रहिवासी बिल्डिंगला खोटा अहवाल तयार करून विभागीय कार्यालयांची दिशाभूल करून मंजुरी मिळवून दिली. वास्तविक सदर बिल्डींग जवळील रोहित्र मारुती मंदिर क्र ४६७६१८५ असून त्यांची क्षमता २०० KVA आहे, व त्यावर IT लोड प्रमाणे ५३० KW वीजभार आहे, असे माहिती अधिकार कायद्या अन्वये प्राधिकरण कार्यालयाने माहिती दिली आहे. महावितरणच्या २१ मार्च २०२१ परिपत्रकानुसार नवीन वीज मागणी आली असता ८० % पेक्षा रोहित्रावर देवू नये, असे निर्देश असतांना देखील देखील वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून दोन्ही अधिकारी यांनी सातव यांच्या इमारतीला जवळ असलेल्या रोहित्रावर वीजभार शिल्लक नाही, म्हणून त्यापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या राधाकृष्ण लान्स ३१५ KVA रीहित्र क्र ४६७६८१९ वर सदर इमारतीचा ६५ KW वीजभार खोटा अहवाल विभागीय कार्यालयांस देऊन वीजभार मंजूर करून घेतला.
परंतु, सदर मजुरी नंतर सदर इमारतीचे फर्म कोटेशन काढतांना मात्र इमारतीच्या जवळ असलेल्या मारुती मंदिर रोहित्र क्र ४६७६१८५ या रोहित्रावरून वीज पुरवठा देण्यात आला. यामध्ये मंजुरी पत्रकातील सूचनेनुसार ग्राहकाकडून एकूण CRA पैकी ग्राहकाने १.३ % मध्ये केलेल्या कामाची महावितरणच्या अंदाज पत्राकातील रक्कम कमी करून उर्वरित १५८२०० रुपये इतकी रक्कम ग्राहकांकडून भरून घ्यावे, असे निर्देश दिले होते. तरी, ते भरून न घेता ग्राहकांस फक्त सुरक्षा ठेवचे कोटेशन देऊन वीज पुरवठा चालू करून देण्यात आला. तसेच, मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे काम करून घेतले नाही, व काम पूर्णत्वाचा दाखला न घेता सदर ठिकाणी मीटर बसविण्यात आले. यांची संपूर्ण माहिती सोबत जोडण्यात आली हे. तसेच, त्याच मारुती रोहित्रावरून टिळेकर यांच्या १६ सदनिका असलेल्या बिल्डींगला सुद्धा वीजभार देण्यात आलेला आहे. यामुळे सदर 200 KVA च्या रोहित्रावर एकुण 595 KW लोड झाला आहे. त्यामुळे सदर रोहित्राचा केव्हाही स्फोट होऊन जिवीतहानी होऊ शकते, असे सौंदणकर आणि बोंडे यांनी म्हटले आहे.
खोट्या अहवालाची चौकशी झाली पाहिजे – नितीन बोंडे…
जुन महिन्यात जगतगुरू तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्याच्या वेळेस महाराष्ट्र मधून वारकरी मोठ्या प्रमाणात देहूगाव परिसरात येत असतात व सदर मारोती मंदिरात सुद्धा १५० ते २00 वारकरी मुक्कामाला असतात अश्या वेळी रोहित्रावर जास्त भार असल्यामुळे स्फोट होऊन मोठी जीवित दुर्घटना होऊ शकते. तरी आपणांस विनंती आहे, की सदर सबडीव्हीजन शाखा कार्यालयामधील सर्व बिल्डरच्या सदनिकाना /प्लॉटिंगला ज्या खोट्या अहवालाच्या आधारे लोड (रोहित्रांचा IT नियमापेक्षा जास्त असलेल्या) मंजुर करून विज पुरवठा केला आहे. त्याकामाची चौकशी करून त्या दोषी अधिकारी यांना ८ दिवसात निलंबित करून संभाव्य जीवितहानी टाळावी. अन्यथा शिवसेना स्टाइलने ऑफीसला टाळे ठोकण्यात येईल. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला महावितरणचे अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा सौंदणकर आणि रुपीनगर शिवसेना विभाग प्रमुख नितीन बोंडे यांनी दिला आहे.