न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२२) :- व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १७ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. यंदा शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून १ लाख ४९ हजार २६८ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास नऊशे जागा कमी झाल्या आहेत. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली.
राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवली जाईल. प्रवेश प्रक्रियेसाठी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेश अर्ज शुल्क भरण्यास १७ जूनपासून सुरुवात होईल. त्यानंतर २२ जूनपासून पहिल्या फेरीसाठी शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर अर्ज निश्चित करता येईल.
तसेच संस्थानिहाय विकल्प आणि प्राधान्यक्रम सादर करता येईल. विद्यार्थ्यांना अर्ज ऑनलाइन किंवा आयटीआयमध्ये ऑफलाइन पद्धतीने भरता येईल. मात्र अर्जात मोबाइल नंबर देणे अनिवार्य आहे. अधिक माहिती https://admission.dvet.gov.in// या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.