- सायं. ६.३० वाजता इनामदार वाड्यात पालखीचा मुक्काम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२२) :- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३७ व्या पालखी सोहळ्याची तयारी पुर्ण झाली आहे. परिसरात टाळ मृदंग अन् हरिनामासह ज्ञानोबा तुकाराम यांच्या नामाचा गजर सुरू असून तुकाराम महाराजांच्या पालखीचे अवघ्या काही वेळातच पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पालखी प्रदक्षिणा होऊन सायंकाळी ६.३० वाजता इनामदार वाड्यात पालखी मुक्कामी असेल, तेथेच मुख्य आरती होणार आहे.
आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासुन उन्हामुळे भाविकांसह स्थानिकांच्या जीवाची काहील होत असतानाच आज काहीसे ढगाळ हवामानामुळे भाविकांचे जथ्थे भजनामध्ये दंग झालेले पाहायला मिळत आहे. सारा परिसर भक्तीरसात न्हाऊन निघत असल्याचे पहायला मिळत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पार पडत होता. एसटीमधून महत्त्वाच्या व्यक्तींसोबत पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असे. परंतु, यावर्षी करोना संख्या आटोक्यात असून कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल होत आहेत. दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा होत असल्याने वारकरी मोठ्या संख्येने दाखल होतील, असं विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगितलं.