- अखरेच्या दिवसापर्यंत हरकतींच्या अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर अनेकांनी हरकत घेतली आहे. सीमेवर असलेल्या अनेक नागरिकांची नावाची यादीच शेजारच्या प्रभागात जोडली गेली आहेत. त्यामुळे हरकतीचे प्रमाण वाढणार असे दिसत आहे. आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी ४६ प्रभागाची प्रारूप मतदार यादी गुरुवारी (दि. २३) प्रसिद्ध केली. ती पालिकेतील निवडणूक विभागात आणि सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयास पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच, पालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आम्ही राहतो त्या प्रभागात आमची नावे नसून, शेजारच्या प्रभागात ती नावे गेली आहेत, अशी हरकत नागरिकांनी घेतली आहे. वाकड प्रभाग क्रमांक ३८ मधील या प्रभागात सर्वाधिक ५२ हजार ६४८ मतदार आहेत. एकगठ्ठा हरकती स्वीकारल्या जात नसल्याने तसेच, एकाच प्रकारची तक्रार असल्याने मोजक्यात हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे हरकतींच्या अर्जाची संख्या कमी आहे. असे प्रकार इतरही काही प्रभागाच्या यादीतही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरकतींची संख्या वाढणार असे दिसत आहे.
हरकती शुक्रवार (दि. १) पर्यंत पालिका भवनातील निवडणुक कार्यालयात कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत. प्रारूप मतदार यादीची विक्री महापालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक विभागात केली आहे. एका पानासाठी दोन रूपये दर आहे. प्रभागातील मतदार संख्येनुसार पानांची संख्या होते त्यानुसार रक्कम भरल्यास पाने उपलब्ध दिली जात आहेत. तर पेनड्राइव्ह घेऊन आल्यास प्रारूप मतदार यादी मोफत लोड करून दिली जात आहे. पेनड्राईव्हसह यादी लोड करून देण्यास ५०० रूपये शुल्क असल्याचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले. मतदार यादीत नाव की नाही हे तपासून घ्यावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे