- महापालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना वार्षिक फी मध्ये सवलत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२२) :- सक्षम समाजाच्या निर्मितीसाठी महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या कासारवाडी येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या वर्षीच्या सत्राकरिता विविध ट्रेड्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून याकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या दृष्टीने इच्छुक विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील आयुक्त पाटील यांनी केले आहे.
महिला वर्गाला सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जातात. महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे मुलींसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध ट्रेड्ससाठी सत्र ऑगस्ट २०२२ करिता प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.
कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या १ वर्षीय प्रशिक्षण कालावधी असणाऱ्या ट्रेडसाठी २४ इतकी प्रवेश क्षमता असणारी १ तुकडी असणार आहे. फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या ट्रेडसाठी २० एवढी प्रवेशक्षमता असणारी १ तुकडी असेल. या ट्रेडसाठी प्रशिक्षण कालावधी १ वर्ष असणार आहे. तर डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर, बेसिक कॉस्मॉटोलॉजी, हॉस्पिटल हाऊस किपिंग या १ वर्षीय प्रशिक्षण कालावधी असणाऱ्या ट्रेड्ससाठी २४ इतकी प्रवेश क्षमता असणारी १ तुकडी असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या २ वर्षीय प्रशिक्षण कालावधी असणाऱ्या ट्रेडसाठी २४ इतकी प्रवेश क्षमता असणारी १ तुकडी असेल. इयत्ता १० वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थिनी या ट्रेड्ससाठी अर्ज करू शकतात.
विविध ट्रेड्स प्रवेशासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधून केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत बाबत कार्यवाही करावी. मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाबत संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संस्थेतील सर्व प्रवेशित जागांवर शासन नियमावली व आरक्षणानुसार ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे ( कॅप राउंड) प्रणालीनुसार १०० टक्के जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रहिवाशी विद्यार्थ्यांना वार्षिक प्रशिक्षण शुल्क १५०० रुपये व अनामत रक्क्कम ६०० रुपये इतके आकारण्यात येणार आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दी बाहेरील विद्यार्थ्यांना वार्षिक शुल्क ५ हजार रुपये आणि अनामत रक्कम ६०० रुपये आकारण्यात येईल, अशी माहिती कासारवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.
ऑनलाईन अर्ज आणि पर्यायी अर्ज भरण्याची सुविधा कासारवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये निशुल्क उपलब्ध आहे. संस्थेमध्ये प्लेसमेंट आणि उद्योजकता कक्ष उपलब्ध असून आयटीआयचे प्रशिक्षण म्हणजे रोजगाराची हमी आणि स्वयंरोजगाराची संधी असून प्रवेशोत्सुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ८८०५०१३९६५, ७७२२०१०७२०, ९९२२७५७४०१, ९१४६१८५८५५, ९५७९२१३७०६, ९७६७००३५९५, ८८०५०००८६६ या साधावा, असे प्राचार्य पाटील यांनी सांगितले.