- वर्षाला साडेतीन कोटी रूपयांच्या बचतीचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका वीज बचत आणि पारंपरिक विजेला पर्याय म्हणून स्वतःच्या ८४ मिळकतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविणार आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर महापालिकेची वर्षांला साडेतीन कोटी रूपयांची बचत होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालय सोडून इतर सात क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या सातही क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शाळा दवाखाने, विविध कार्यालये, नाट्यगृहे इत्यादी इमारतीच्या छतावर उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे.
या कामासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार में रेझोल्युशन सिस्टिम्स प्रा. लि. यांच्यामार्फत पालिकेच्या विविध ८४ इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या इमारतींवर ३ हजार ९७ किलो वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी सुमारे १६ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला पालिकेची ३ कोटी ५२ लाख रुपयांची बचत होणार असल्याचा पालिकेच्या विद्युत विभागाचा दावा आहे. तसेच हा खर्च अवघ्या चार वर्षात वसूल होणार असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शहरात महापालिकेच्या ९५० मिळकती आहेत. यामधील ६४ मिळकतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविली आहे. यामधून दररोज ४ हजार २४० युनिट वीज निर्मिती होत आहे. त्यामुळे महापालिकेची वार्षिक १ कोटी ४१ लाखांची बचत होत आहे. मात्र जास्तीत जास्त पालिकेच्या इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविण्याचा विद्युत विभागाचा प्रयत्न आहे. यामुळे आर्थिक बचत आणि पालिका स्वावलंबन होणार आहे. यापूर्वी ६४ तर आता ८४ इमारतीवर सौर उर्जा यंत्रणा बसविल्यानंतर १४८ मिळकतींवर ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.