न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ जुलै २०२६) :- पिंपरीतील अजमेरा परिसरातील रेडिमेड कपड्यांच्या व्यवसायात विश्वासघात करून ५ लाख ५६ हजार ८४० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
याप्रकरणी रचित प्रभू छबाडा (वय ३६) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रवि संबुलाल बठलिया (वय ३९, व्यवसाय – कपडा व्यवसाय) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील तीन महिन्यांपासून फिर्यादी यांच्या अजमेरा येथील दुकानात काम करत होता. महाराष्ट्रात स्वतःच्या अनेक ओळखी असल्याचे सांगून कपड्यांचे दुकान सुरू करून देण्याचे आमिष त्याने फिर्यादीला दाखवले. त्यानंतर विक्रीसाठी विश्वासाने देण्यात आलेल्या २,७६० रेडिमेड कपड्यांपैकी २,५२८ कपड्यांची परस्पर विक्री करून त्यातून मिळालेले ५ लाख ५६ हजार ८४० रुपये स्वतःकडे ठेवत अपहार केला, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिवटे करत आहेत.


















