शहरातील आठ गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मे. २०२१) :- मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या बारा दुचाकी हस्तगत करण्यात केल्या. दिलीपकुमार शालिग्राम विश्वकर्मा (वय २२, रा. ठोंबरे चाळ, परीस कॉलनी, तापकीर नगर, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर आणि पोलीस नाईक विजय गंभीरे यांना बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सराईत वाहनचोर पाचपीर चौक, काळेवाडी येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी दिलीपकुमार विश्वकर्मा याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मौजमजेसाठी बारा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख २२ हजार रुपये किमतीच्या बारा दुचाकी हस्तगत केल्या. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील सात आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. इतर चार वाहनांच्या मालकाचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.