न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२२) :- युवकांनी आपल्या करिअरच्या बाबतीत सजग राहावे व कोणत्याही कामाविषयी अमुक एक काम कमीपणाचे अशी भावना मनात न आणता सातत्याने नवीन गोष्टी शिकण्याची मानसिकता तयार ठेवावी व स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्नशील राहावे असे मत कोटक एज्युकेशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश राजा यांनी व्यक्त केले.
यशस्वी अकॅडमी फोर स्किल्स च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बँकिंग अँड फायनान्शिअल सर्विसेस अँड इन्शुरन्स तसेच कस्टमर रिलेशन सर्विस या दोन मोफत अभ्यासक्रमांच्या पहिल्या तुकडीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी स्वतःचे अनुभव सांगत बँकिंग वरील व रिटेल क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध रोजगार संधी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले की कोर्सेस जरी मोफत असले तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा मोफत आहे म्हणून दुर्लक्ष करू नये. अनुभवी तज्ञ प्रशिक्षक आपल्याला प्रशिक्षण देणार आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या दोन संस्था एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी ही संधी आणत आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी खूप लक्ष देऊन शिकावे. अडचणी आल्या, शंका आल्या तर जरूर विचाराव्यात. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात अशा प्रकारची संधी मिळणे ही खूप मोलाची बाब आहे, याचा युवकांनी योग्य पद्धतीने फायदा घ्यावा. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी देखील सकारात्मकतेने स्वीकाराव्यात असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाला कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या प्रकल्प प्रमुख नम्रता अशोक, यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ, यशस्वी संस्थेच्या सीएसआर विभागाचे प्रमुख कन्नन व यशस्वी संस्थेचे संचालक राजेश नागरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता करमरकर यांनी तर आभार प्रदर्शन कन्नन के सी एस यांनी केले.