- एसएनबीपी इंटरनॅशनल शाळेत उस्ताद झाकीर हुसेन रंगमंचाचे दिमाखात उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या रहाटणी येथील एसएनबीपी इंटर नॅशनल शाळेत उस्ताद झाकीर हुसेन यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या भव्य रंग मंचाचे उद्घाटन स्वतः उस्ताद झाकीर हुसैन यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
या वेळी उस्ताद हुसेन यांनी सादर केलेल्या तबलावादनाने पिंपरी चिंचवडकर मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रम प्रसंगी संगीतकार पद्मश्री विजय घाटे , संस्थेचे संस्थापक डॉ. डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, संचालिका ऍड. ऋतुजा भोसले, देवयानी भोसले यांच्यासह अन्य मान्यवर तसेच संस्थेच्या विविध शाखेचे प्राचार्य ,शिक्षक ,विद्यार्थी व संगीतप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने उस्ताद झाकीर हुसैन यांचा पुणेरी पगडी, दगडूशेठ गणपतीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सरस्वती पूजन तसेच तबलावादक आणि विद्यार्थ्यांनी तालवाद्याचे मौखिक निरूपण सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी वेदवाचन केले.
उस्ताद झाकीर हुसैन यांनी तबला वादन करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. ४ हजारहुन आधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या तबला वादनास विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली. उस्ताद हुसैन यांना मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनिअमवर साथ दिली.
दरम्यान यावेळी बोलताना उस्ताद झाकीर हुसैन म्हणाले की, सरस्वतीच्या विद्या मंदिरात मी आलो , सरस्वतीचाच हा आशीर्वाद आहे. शाळेतील लहान मुलांना पाहून मला माझ्या बालपणाची आठवण झाली. माझे वडील मला पहाटेच तबला वादनाचे धडे देत.संस्थेतील गुरूजन या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहेत. संगीताचे संस्कार त्यांच्यावर करत आहेत ही आंनदाची बाब आहे . हीच मुले ही संस्कृती पुढे नेतील. संगीताच्या शिक्षणामुळे मुलांचे मन प्रसन्न होईल.
संस्थापक डॉ. भोसले म्हणाले, उस्ताद हुसेन यांचे संगीत क्षेत्रातील उल्लेख कार्याचा गौरव म्हणून शाळेतील रंगमंचाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतः झाकीर हुसेन यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला याचा मनस्वी आनंद आहे. तबला वादनाचे धडे घेत असलेल्या संस्थेतील शेकडो विद्यार्थ्यांना हुसेन यांच्या मुळे नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ वृषाली भोसले म्हणाल्या, पद्मभूषण हुसेन यांचे आमच्या शाळेत झालेले आगमन हे सुवर्ण अक्षरांनी वर्णावे असा आहे. माता सरस्वती चे वरदान लाभलेला देवतुल्य माणूस संस्थेत आला हा क्षण आमच्या साठी अविस्मरणीय आहे. सारे जगभर हुसेन यांच्या तबला वादन कलेचे चाहते आहेत.त्यांच्या अप्रतिम तबलावादनास मिळालेला प्रतिसाद पाहता कार्यक्रमासाठी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले आहे.