न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२३) :- सरकारी रुग्णालयांनी व्यवसाय न करता केवळ सेवेच्या भावनेतून काम केले पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशाच भावनेतून शहर आणि परिसरातील रुग्णांना सेवा देत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली तसेच तेथील वैद्यकीय सेवांची आणि विविध विभागांची माहिती घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना संगणकीय सादरीकरणाद्वारे महापालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, वायसीएम अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत लाठी, डॉ. अशोक सोनी, डॉ. मारुती गायकवाड, डॉ. दिपाली अंबिके, डॉ. प्रवीण सोनी, यांच्यासह माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक ऍड. सचिन भोसले, अनंत कोऱ्हाळे आदी उपस्थित होते.
रुग्णांना तत्पर आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग, तज्ञ डॉक्टर आणि अत्याधुनिक मशिनरींची संख्या पुरेशा प्रमाणात असली पाहिजे त्यामुळे वैद्यकीय व्यवस्थापनावर ताण येणार नाही, शिवाय रुग्णांना उत्तम सेवाही देता येईल त्या दृष्टीने महापालिकेने विचार करून आवश्यक ती पूर्तता करावी, अशा सूचना अंबादास दानवे यांनी दिल्या. तसेच अतिदक्षता विभागाची क्षमता वाढवावी, रुग्णालयासाठी स्वतंत्र पोलीस चौकी तयार करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे मागणी करावी, शासनाने लागू केलेल्या सर्व योजनांचा अंतर्भाव करून त्याचे लाभ रुग्णांना द्यावेत अशा आदी सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
विरोधी पक्षनेते दानवे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील ऑपेशन थिएटर, स्त्री रोग व प्रसूती विभागालाही भेट दिली आणि तेथे दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस केली तसेच रुग्णालयात असलेल्या विविध सेवा सुविधांची पाहणी करून रुग्णालयात असणाऱ्या नाविन्यपूर्ण सेवा आणि उपक्रमांबाबत माहिती घेतली.
ऑक्सिजन प्लांट, औषधांचा साठा, बिलींग प्रणाली, व्हेंटिलेटर व्यवस्था, प्रसूती संख्या, माता व बाल मृत्यूचे प्रमाण, रुग्णालयात दाखल होणाऱ्या आंतर व बाह्य रुग्णांची आकडेवारी, पदव्युत्तर संस्था, नर्सिंग कॉलेज आदींबद्दल सविस्तर माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, वायसीएम अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी विरोधी पक्षनेते दानवे यांना दिली.
कॅन्सर रुग्णालय, बर्न केअर सेंटर अशा समर्पित रुग्णालयांची आवश्यकता असून महापालिकेने अशी रुग्णालये लवकरात लवकर उभारावीत, अशा सूचना विरोधी पक्षनेते दानवे यांनी यावेळी दिल्या तसेच महापालिका स्वतःच्या निधीतून रुग्णालय चालवून उत्तम सेवा देत आहे ही विशेष बाब आहे अशा शब्दात त्यांनी महापालिका रुग्णालय व्यवस्थापनेचे कौतुकही केले.