- तलाठी कार्यालयासह मुख्य तहसिल कार्यालयाची होणार निर्मिती?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२३) :- निगडीतील अप्पर तहसील कार्यालयाला चिखली येथे कार्यालय मिळणार आहे. २० गुंठे जागेची मागणी करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर सकारात्मक तोडगा काढून शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे. या प्रस्तावाला गती मिळाल्यास तलाठी कार्यालयासह मुख्य तहसिल कार्यालयाची निर्मिती होणार आहे.
सध्या निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारी अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. या ठिकाणची जागा अपुरी पडत आहेत. उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला आदीसह विविध दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. महाविद्यालयीन प्रवेशावेळी रहिवाशी आणि उत्पन्नाच्या दाखल्यांसाठीची नोंद दिवसाकाठी ७०० आहे. कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे दाखल्यांच्या वाटपाची धीमी गती आहे. कार्यालयात सध्या आठ क्लार्क असून, त्यापैकी दोघांना इतर कार्यालयाचा भार दिला आहे. त्यामुळे सहा क्लार्क, एक अव्वल कारकून, नायब तहसीलदार आणि अप्पर तहसीलदार एवढ्यावरच कार्यालयाच्या कामकाजाचा भार येत आहे
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था नाही. साहित्य ठेवायला जागा नाही. त्यामुळे सुसज्ज कार्यालय होण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार झाले आहेत. मात्र, त्याला गती मिळाली नाही. सध्या चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जवळील २० गुंठे जागेची मागणी करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार एकदा बैठक घेऊन शासनस्तरावर कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सकारात्मकता दर्शवली आहे.
पुर्वी हवेली तहसील कार्यालयांर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होता. कालांतराने शहराची लोकसंख्येत मोठी वाढ झाली. सध्या २७ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. त्याचा विचार करून निगडी येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र २०१३ पर्यंतचे शहरातील दस्ताऐवज अद्याप हवेली तहसील कार्यालयातच पडून आहेत. ते घेऊन जाण्याबाबत वारंवार सूचना केल्या जात आहेत. मात्र निगडी येथील कार्यालयाला जागा अपुरी असल्याने ते दस्ताऐवज अद्यापही आणले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चिखली येथे तहसील कार्यालयाची इमारत उभी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. २० गुंठे जागेची मागणी त्यामध्ये केली आहे. या ठिकाणी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयाची निर्मिती केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवली असून एकत्र बैठक घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे. – अर्चना निकम, अप्पर तहसीलदार…