न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १८ नोव्हेंबर २०२३) :- देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील परंडवाल चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत पदपथावर झालेल्या अतिक्रमणांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, यावेळी पोलिसांची मदत घेण्यात आली.
नगरपंचायतीचे उपमुख्याधिकारी रामराव खरात, कर संकलन विभागाचे ज्ञानेश्वर शिंदे, बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड, कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून प्रवेशद्वार कमान ते डॉ. आंबेडकर चौक या रस्त्याच्या दरम्यान दुतर्फा आणि ठिकठिकाणी पदपथांवर व्यापाऱ्यांनी पक्की बांधकामे किंवा पत्रा शेड ठोकून अतिक्रमणे केली होती. परिणामी या रस्त्यांवर गर्दी होत होती व वाहतुकीला अडथळा होत होता. शिवाय सणांच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य विक्रेत्यांची दुकाने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभारण्यात आली होती, गावात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चौकात वाहने उभी करण्यास जागाच मिळत नव्हती. अतिक्रमणधारकांच्या व्यवसायातील स्पर्धेमुळे जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आपापसात भांडणे झाल्याने पोलिस ठाण्यापर्यंत तक्रार पोहोचली होती. काही विक्रेते नगरपंचायत कर्मचा-यांबरोबर भांडत होते. नागरिकांना होणाऱ्या दादागिरीने अतिक्रमणे हटवण्याबाबत तक्रार केली होती. प्रशासनाने दिवाळी संपल्यानंतर कारवाई केली.
रस्त्यांवरील हातगाड्या, प्रवेशद्वाराच्या परिसरातील टप-या तसेच प्राथमिक शाळेसमोर ओपन जीमसाठी तयार करण्यात आलेल्या जागेवर झालेले अतिक्रमण स्वतःहून काढण्यासाठी प्रशासनाने ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन केले होते. या आवाहनानंतरही ती न हटवल्याने कारवाई करण्यास भाग पडले. अखेर पोलिस बंदोबस्तामध्ये अतिक्रमणांवर धडक कारवाई केली.
देहू नगरपंचायत हद्दीत बेकायदेशीर फ्लेक्समुळे परिसराचे विद्वद्रुपीकरण होत असल्याने नगरपंचायतीने नियुक्त केलेल्या ठराविक ठिकाणी रीतसर परवानगी घेऊनच पत्लेक्स उभारण्यात यावेत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– रामराव खरात, उपमुख्याधिकारी..पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाकडून धडक कारवाई करीत सर्व साहित्य जप्त करण्यात येईल आणि त्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करू.
– संघपाल गायकवाड, बांधकाम अभियंता…प्रशासन केवळ कारवाईचा दिखावा करीत असून अतिक्रमणे कायमची बंद व्हावीत यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. जेणेकरून रस्त्याच्या कडेला व पदपथावर अतिक्रमणे होणार नाहीत.
– नितीन गाडे, अध्यक्ष, तळेगाव-चाकण महामार्ग विकास समिती..