- भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुनावळे येथील वन विभागाच्या जागेवर घनकचरा व्यवस्थापनासाठी डेपो विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. वाढत्या शहरासाठी नवीन कचरा डेपो उभारण्यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करीत आहे. त्याला स्थानिक रहिवाशांसह हाऊसिंग सोसायट्यांकडून विरोध होत आहे. त्याबाबत नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
पुनावळे कचरा डेपोचा मुद्दा शहरात गाजत आहे. कचरा डेपोसाठी वन विभागासाठी चंद्रपूर जिल्हातील वन क्षेत्राच्या बाजूची खासगी जागा महापालिकेने खरेदी केली आहे. एकूण २३.०९ हेक्टर जागा महापालिकेने ९ कोटी रूपयांत खरेदी केली आहे. ती जागा महापालिका वन विभागास देणार आहे. त्या बदल्यात महापालिकेस पुनावळे येथील २२.६० हेक्टर जागा वन विभाग देणार आहे.
ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन पुनावळेची जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येईल, असे महापालिकेकडून समजले आहे. दुसरीकडे, कचरा डेपोच्या परिघातील सीमाभिंतीच्या १०० मीटर परिसरात महापालिका झाडे लावणार आहे.
पुनावळे कचरा डेपोसाठी अद्याप भूसंपादन झालेले नाही. त्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना त्याचा कोणताही त्रास होणार नाही. कचऱ्यावर लगेचच प्रक्रिया केल्यामुळे दुर्गंधी देखील येणार नाही. मोशीतील नागरिकांनी ज्याप्रकारे सहकार्य केले तशीच अपेक्षा पुनावळेतील नागरिकांकडून आहे. भूसंपादन झाल्यावर पर्यावरणास निरूपयोगी असलेली तेथील ग्लिरिसिडियाची झाडे तोडण्यात येणार आहेत. त्याजागी महापालिका देशी जातीचे झाडे लावणार आहे. – मा. संजय कुलकर्णी – सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग, पिं.चिं.मनपा…