न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२४) :- जुन्या प्रेयसीला (एक्स गर्लफ्रेंड) भेटायला गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. २८) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास यशवंतनगर, पिंपरी येथे घडली.
एक्स गर्लफ्रेंडच्या आताच्या प्रियकराने तरुणाच्या अंगावर कार घातली तसेच त्याला बेदम मारहाण केली. निलेश दिलीप शिंदे (वय ३०, रा. गवळीमाथा, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सुशील भास्कर काळे (४१, रा. थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शरद जगन्नाथ टिळक (२५, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, निलेश शिंदे यांचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांचे मागील काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. दरम्यान निलेश यांनी एक्स गर्लफ्रेंडला भेटण्याची इच्छा व्यक्त करत तिला यशवंतनगर येथे बोलावून घेतले. दरम्यान तिने हा प्रकार आपल्या प्रियकराला म्हणजेच सुशील याला सांगितला.
निलेश हे मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवर बसून एक्स गर्लफ्रेंडसोबत बोलत थांबले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून सुशील हा कार घेऊन आला. आपल्या प्रेयसीला बोलत थांबलेल्या निलेश यांच्या दुचाकीला सुशील याने कारने धडक दिली. या धडकेत निलेश दुचाकी वरून खाली पडले. त्यानंतर त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी सुशील याने निलेश यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. सुशील काळे याने कारमधून उतरून निलेश यांच्या तोंडावर, छातीवर लाथा मारल्या. यामध्ये निलेश हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी सुशील याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.