न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२४) :- गुणवंत कामगार कल्याण मंडळ पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने गुणवंत कामगार कौटुंबिक स्नेह मेळावा रविवारी कामगार कल्याण भवन संभाजीनगर, चिंचवड येथे संपन्न झाला.
मेळाव्यास पिंपरी चिंचवड औदयोगिक नगरीतील कंपन्यांमधील महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाकडून निवड झालेले आजी व माजी शहर गुणवंत कामगार त्यांच्या कुटुंबियांसोबत उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती टाटा मोटर्सचे माजी महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती राज्य अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या राज्य अध्यक्ष भारती चव्हाण, मंडळाचे शहराध्यक्ष महंमद शरीफ मुलाणी यांची होती.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष टाटा मोटर्स चे माजी महाव्यवस्थापक मनोहर पारळकर म्हणाले, “शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये औद्योगिक कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या श्रमिक कामगारांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्यामुळे शहरास औद्योगिक नगरीचे स्वरूप प्राप्त झाले.हेच कामगार उद्योग विभागात कार्यरत असताना सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याने त्यांची गुणवंत कामगार म्हणून शासनाकडून नियुक्ती होते. आपल्या शहरात ह्या गुणवंत कामगारांचा कौटुंबिक स्नेह मेळावा होणे ही आनंदाची बाब आहे.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले,” गुणवंत कामगार बनण्यासाठी अनेक वर्ष कामगार सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी होत असतो, समाजातील तळागाळापर्यंत असलेल्या व्यक्तीनंपर्यंत पोहचतो. पोलीस मित्र एस पी ओ,सांस्कृतिक, शैक्षणिक ,पर्यावरण,क्रीडा, नाट्य,कला, आरोग्य अश्या विविध सामाजिक क्षेत्रात तो कार्यरत असतो .या कार्याच्या आलेखामुळेच कामगारांना गुणवंत म्हणून संबोधले जाते. राज्यातील गुणवंत कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस कृती आराखडा बनविणे आवश्यक वाटते.”
गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या राज्य संस्थापक अध्यक्षा भारती चव्हाण म्हणाल्या,” पिंपरी चिंचवड शहराची पायाभरणी ही औदयोगिक कंपणीमधील कामगारांनी त्यांच्या श्रमाने केलेली आहे. त्यामुळेच शहरात आज मोठ्या नामवंत कंपन्या लौकीकास पोहचल्या.ह्या कामगारांच्या साथीला त्यांचे कुटुंबीय प्रमुख पडद्यामागील भूमिका बजावत आलेले आहे. घरातील महिला त्यांच्या पाठीशी खंबिर उभ्या राहिल्याने शहरात मोठ्या संख्येने गुणवंत कामगारांची फळी उभी राहिली.त्यांच्या कुटुंबीयांचा विकास चारही बाजूने समांतर होण्यासाठी राज्यात गुणवंत कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली.”
कार्यक्रमात हाफकीन कंपनीत कार्यरत असणारे प्रवीण वाघमारे,माहिती अधिकार संघाचे नितीन यादव, टाटा मोटर्सचे डॉ मोहन गायकवाड, संदिप पोलकम, श्रीकांत कदम,किरण देशमुख,शिवाजी पाटील,लक्ष्मण इंगवले,कवी सुरेश कंक, जेष्ठ पोलीस मित्र मनोहर दिवाण, लोकमान्य हॉस्पिटलचे हनुमंत जाधव, विशेष कार्य संस्था हेतू प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
गुणवंत कामगार कुटुंबीय दाम्पत्याचा विशेष सन्मान तसेच नवीन सहभागी झालेल्या मंडळाच्या सदस्यांना नियुक्ती पत्राचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. स्वागत गीत नेहा साळुंके यांनी गायले. कार्यक्रमाचे आयोजन सतिश देशमुख, संजय गोळे, तानाजी एकोंडे,भरत शिंदे, गोरक्षनाथ वाघमारे,श्रीकांत जोगदंड,महादेव धर्मे, बाळासाहेब साळुंके, उद्धव कुंभार, अशोक सारतापे,महेंद्र गायकवाड, सोमनाथ पतंगे,अण्णा गुरव,लक्ष्मण इंगवले, ज्ञानेश्वर मलशेट्टी, चंद्रकांत लव्हाटे, कल्पना भाईंगडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष महंमद मुलाणी यांनी केले. संस्था परिचय सचिव राजेश हजारे यांनी दिला, सूत्र संचालन भरत बारी यांनी केले.