- घरगुती वापरासाठी हे मीटर लागू केले जाणार नसल्याचा उर्जामंत्र्यांचा निर्वाळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२४) :- मागील काही दिवसांपासून विजेच्या स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत, त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील, असे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले.
मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही, असे स्पष्ट केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील, असे स्पष्ट झाले.
स्मार्ट मीटरचे कंत्राट अदानी पॉवर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी, मॉन्टेकालों या कंपन्यांना देण्यात आले होते. येत्या आठवड्यापासून ते बसविण्यास सुरुवात होणार होती. आता मात्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधीच स्मार्ट मीटरविरोधात नाराजीचे सूर उमटले होते. वीजग्राहक आणि वीज कर्मचाऱ्यांमध्येही त्याबाबत रोष होता. या मीटरमुळे रमुळे विजेचे बिल अधिक येईल, असा काहींचा दावा होता. स्मार्ट मीटर हे प्रीपेड स्वरुपाचे आहे. त्यामुळे वीज चोरी, चुकीचे मीटर रिडिंग करून अवाजवी बिले दिली जाणे याला आळा बसेल, असे महावितरणचे म्हणणे होते. सध्याच्या पद्धतीत वीज कर्मचारी रिडिंग घ्यायचे, वीज बिलांचे वाटप करायचे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर स्मार्टमीटरमुळे गदा येईल, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे होते.