- खासगी शाळांतील विद्यार्थांना ७५ टक्के सवलत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२४) :- पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थांसाठी अनुदानित बस प्रवासी पास वितरण योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या शंभर टक्के अनुदानित शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पास देण्यात येणार आहेत. खासगी शाळांतील विद्यार्थांना ७५ टक्के सवलत असेल. त्यासाठी शनिवारपासून सर्व पास केंद्रावर अर्ज उपलब्ध करुन देण्यास सुरुवात झाली आहे.
पीएमपीएमएलच्या निगडी, भोसरी, पिंपरी, नेहरुनगर बस पास केंद्रांवर आणि पिंपरी मुख्यालय क्रमांक २ (लोखंडे भवन) या ठिकाणी अर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. अचूक माहिती भरलेले अर्ज महामंडळाच्या आगारामध्ये स्वीकारण्यात येतील. शाळा किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी हे विद्यार्थांसाठीचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारामध्ये एकत्रितरित्या जमा करु शकणार असल्याने शैक्षणिक संस्थांना एकत्रित पास मिळण्याची सोय झाली आहे.
अनुदानित बस प्रवासी पास वितरण योजनेसंर्दभातील साविस्तर माहिती महामंडळाच्या निगडी, भोसरी, पिंपरी, (नेहरूनगर) आगार पिंपरी मुख्यालय – २ येथे कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते सायंकाळी ६ वा.) दिली जाईल. शहरातील महापालिका तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थांसाठी ही खास योजना सुरु केल्याने जास्तीत जास्त विद्यार्थांनी तिचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याबाबत समस्या निर्माण झाल्यास मदतीसाठी ०२०-२४५४५४५४ क्रमांकावर संपर्क साधावा.