न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२४) :- शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) इलेक्ट्रिशियन, फीटर, प्लंबर या अभ्यासक्रमांबरोबरच सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना देखील पसंती वाढत चालली आहे. ‘रेफ्रिजरेशन एअरकंडिशनिंग टेक्निशियन’ या अभ्यासक्रमाला नव्याने मागणी वाढली आहे. तर, फॅशन डिझायनिंग, कॉस्मेटॉलॉजी हे ट्रेड शिकुन घेण्याकडे मुलींचा कल वाढला आहे.
राज्यभरातील आयटीआयसाठी सध्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी ३० तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात येत आहे. त्यानंतर गुणवत्ता आणि आरक्षणानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, त्या आधारे विद्यार्थ्यांना कोणत्या ट्रेडसाठी आणि कोणत्या आयटीआयमध्ये प्रवेश घेता येईल, हे स्पष्ट होणार आहे.
महापालिकेच्या मोरवाडी येथील आयटीआयमध्ये १४ ट्रेडसाठी ५०० जागा आहेत. त्यातील प्रामुख्याने इलेक्ट्रिशियन, फीटर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, ड्राफ्टसमन मेकॅनिकल आदी विविध उद्योगांशी निगडीत अभ्यासक्रम शिकुन घेण्यावर मुलांचा भर असतो. तर, विद्यार्थ्यांना स्वतः या व्यवसाय सुरु करता यावा, या उद्देशाने शिकविण्यात येणारा ‘रेफ्रिजरेशन एअरकंडिशनिंग टेक्निशियन’ हा अभ्यासक्रम सध्या महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्याशिवाय, प्लंबर, वेल्डर, वायरमन आदी व्यवसायाभिमुख ट्रेडला देखील चांगली पसंती मिळत असल्याची माहिती प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.
यमुनानगर येथील शासकीय आयटीआयमध्ये सध्या मशीनिस्ट, फीटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सीटमेटल वर्कर या पाच अभ्यासक्रमांना चांगली मागणी आहे. येथे एकूण १३ ट्रेडसाठी ४७६ जागा आहेत, अशी माहिती प्राचार्य शशिकांत साबळे यांनी दिली.
महापालिकेच्या कासारवाडी येथील मुलींच्या आयटीआयमध्ये सध्या कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रमिंग असिस्टंट या अभ्यासक्रमाबरोबरच बदलत्या काळानुसार फॅशन डिझायनिंग, कॉस्मेटोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल हे ट्रेड शिकून घेण्याकडे मुलींचा भर आहे. हे अभ्यासक्रम शिकल्यानंतर त्यांना नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा मार्ग सोपा होत आहे.