न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२४) :- आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योग हा उत्तम पर्याय असल्याचे नोव्हेल इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष अमित गोरखे यांनी सांगितले. योग दिनाच्या निमित्ताने संभाजीनगर शाहूनगर परिसरातील तसेच नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या महिला व पालकांसाठी जागतिक योग दिनानिमित्ताने योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या योग शिबिराला प्राधिकरणातील मीनल जैन यांनी मार्गदर्शन केले. योग शिबिराला 300 पेक्षा जास्त महिलांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. योग आणि मानसिक स्वास्थ यावर मीनल जैन यांनी योग साधना करून महिला मंडळींना योगाचे वेगवेगळे प्रकार समजून सांगत असताना योग करून दाखविला. यावेळी नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य डॉ. मृदुला गायकवाड, डॉ प्रिया गोरखे, आशिष जैन व्यासपीठावर उपस्थित होते.व्यासपीठावर नोव्हेल संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनीही योग केला.
अमित गोरखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला जागतिक योग दिवस 180 पेक्षा जास्त देशांनी स्वीकारला आहे. हा अभिमान भारतीय म्हणून सर्वांना असलाच पाहिजे. धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायाम करत असताना योग सातत्याने केल्यास मानसिक व शारीरिक बळ मिळते व रोजच्या दैनंदिन कामांमध्ये आणखी ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे बालवयापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी योगा केला पाहिजे. योग दिन आहे म्हणून योगा करणे उचित नाही. योगासनात सातत्य जर आपण अबाधित ठेवलं तर सर्वांनाच याचा फायदा नक्की होईल.