न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२४) :- तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिर समितीच्यावतीने ऑनलाईन स्पेशल देणगी दर्शन पास सुविधा सुरू केली आहे. मंदिराच्या प्रशासन कार्यालयातील तळमजल्यावर ऑफलाईन पद्धतीने ही सुविधा पूर्वीपासूनच सुरू आहे.
देणगी दर्शनसाठी २०० आणि ५०० रुपये प्रति पास अशा दोन सुविधा मंदिर समितीकडून यापूर्वीपासूनच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यातीलच पाचशे रुपयांच्या दर्शन पाससाठी ऑनलाईन सेवेची सुरुवात मंदिर समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
राज्य आणि देशभरातील भाविकांना मोबाईल अॅपवरूनही पास काढून घेता येणार आहे. मोबाईल अॅपची सेवा सोमवार, २२ जुलैपासून कार्यान्वित होणार आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ म्हणून ओळख असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्य आणि देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. गुगल प्ले स्टोअरवर मंदिर समितीने तयार केलेल्या मोबाईल अॅपवरून या स्पेशल देणगी दर्शन पासची नोंदणी आता करता येणार असल्याची माहिती मंदिराचे तहसीलदार सोमनाथ माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.