- नियुक्तीची घोषणा होताच सत्ताधाऱ्यांना दाखवला थोडक्यात ट्रेलर..
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या चाणाक्ष नीतीचा पिंपरीत पहिला प्रयोग..
विरोधक म्हणून पराभवाची सल भरून काढण्याच्या तयारीत…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनुभवी चेहऱ्यावर विश्वास दाखवत ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे महापालिकेतील राजकारण अधिक संघर्षमय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी ही रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या निर्णयामागे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची चाणाक्ष रणनीती असल्याचे बोलले जात असून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर प्रभावी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. भोईर यांच्या नियुक्तीनंतर विरोधी पक्ष अधिक आक्रमक होणार असून महापालिकेतील निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नियुक्ती जाहीर होताच भोईर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत कठोर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “नुसता विरोधाला विरोध करण्याचा आमचा हेतू नाही; मात्र चुकीच्या निर्णयांना शंभर टक्के विरोध केला जाईल. विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली नाही तर, स्व. अजितदादा पवारांचा हा अपमान ठरेल. आम्हाला सत्तेत सहभागी होण्याची कोणतीही इच्छा नाही.”
या भूमिकेमुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता असून चुकीच्या विकासकामांवर राजकीय वादाचे सावट राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












