- ‘शक्य ती मदत करू’; विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची सभागृहात मागणी..
- भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंनाही काढला महापौर पदावरून चिमटा..
- अजितदादांना श्रध्दांजली वाहत सभा दोन आठवड्यांसाठी तहकूब…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ६ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी आज गुरुवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेची तब्बल ३ वर्षे १० महिने २४ दिवसांची प्रशासकीय राजवट महापौर रवी लांडगे यांच्या निवडीनंतर संपुष्टात आली.
दरम्यान नवीन सभागृहात सत्तारूढ पक्षनेतेपदी भाजपा नगरसेवक प्रशांत शितोळे यांची तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
सभागृहात बोलताना नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. जड अंत:करणाने सभागृहात प्रवेश केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शहराची उंची अजितदादांनी वाढवली असून त्यांच्या नेतृत्वाखाली आज सर्वजण घडले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील काही जण सत्तेत तर काही विरोधात बसल्याची जाणीवही त्यांनी करून दिली.
महापौर रवी लांडगे यांना त्यांच्या वडील आणि चुलत्यांबरोबर काम केल्याचा संदर्भ देताना भोईर म्हणाले, “आता तुमच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, यापुढे तुमच्या मुलांबरोबर मला काम करावे लागू नये,” अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यामुळे सभागृहात हास्याची खसखस पिकली. पुढील पाच वर्षांनंतर शहर कसे असेल? याची ‘ब्लू प्रिंट’ तयार करा. त्यासाठी तुम्हाला शक्य ती मदत करू.
पुढे बोलताना त्यांनी नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनाही महापौरपदाच्या संदर्भात “पद एकच असते” असे म्हणत चिमटा काढला. तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे संख्याबळ वाढल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
स्व. अजित पवार यांच्या अकाली निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगत भोईर यांनी त्यांच्या तैलचित्राचा सभागृहात समावेश करावा तसेच नव्या महापालिका इमारतीत त्यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांच्यासह सर्वांकडे केल्याचे सांगितले.
नवनिर्वाचित सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले की, शहराला गती देण्याचे काम सर्वांना सोबत घेऊन केले जाईल. अजितदादांच्या आठवणी विसरणे अशक्य असून शहराला दिशा देणारा कर्तृत्वसंपन्न नेता आपल्यातून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भाऊसाहेब भोईर यांच्या मागणीला अनुमोदन देत स्व. अजित पवार यांचे तैलचित्र, नव्या महापालिका इमारतीत भव्य ब्राँझ पुतळा आणि ‘अजितसृष्टी’ उभारून त्यांच्या स्मृती जपण्याचे कार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ही सभा २० फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्याची सूचना केली. या सूचनेला नगरसेवक राजू मिसाळ यांनी अनुमोदन दिले. त्याची दखल घेत महापौर रवी लांडगे यांनी सभा २० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब केल्याची घोषणा केली.












