- आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २१ फेब्रुवारी २०२६) :- श्रीक्षेत्र देहू येथे वै. जनाबाई रामचंद्र हगवणे यांच्या स्मरणार्थ हगवणे परिवाराच्या वतीने स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ “वैकुंठधाम प्रवेशद्वार” या नावाने भव्य व आकर्षक कमान उभारण्यात आली. सुमारे १४ लाख रुपये स्वखर्चातून खर्च करून ही कमान उभारण्यात आली असून या कार्यामुळे गावाच्या सौंदर्यात व प्रतिष्ठेत मोलाची भर पडली आहे.

या प्रवेशद्वाराचे लोकार्पण मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. यावेळी आमदार शेळके यांनी हगवणे परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत सांगितले की, “गावाच्या विकासासाठी निःस्वार्थ भावनेतून योगदान देणारी माणसे हीच खऱ्या अर्थाने गावाची शान असतात. हगवणे परिवाराने उभारलेले हे प्रवेशद्वार समाजासाठी प्रेरणादायी आहे.”
हगवणे परिवाराच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रामचंद्र तुकाराम हगवणे, मच्छिंद्र रामचंद्र हगवणे व सुमित मच्छिंद्र हगवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, मावळ तालुका पंचायत समिती सदस्य दिलीप ढोरे, देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पुजा दिवटे, उपनगराध्यक्ष बंडा काळोखे, मुख्याधिकारी चेतन कोंडे, माजी सरपंच अशोकराव मोरे, कृष्णा परंडवाल, मधुकर कंद, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा कौशल्याताई काळोखे, उद्योजक आबासाहेब भेगडे, पोलीस अधिकारी दत्तात्रय मुरकुटे, कामगार नेते भाऊसाहेब भोसले, सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, माजी उपसरपंच सचिन कुंभार, नगरसेवक प्रविण काळोखे, आनंदा काळोखे यांसह विविध मान्यवर, मित्रप्रेम संघटनेचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सुमित हगवणे व गिरीश काळोखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विकास कंद यांनी केले, तर आभार प्रदर्शन मच्छिंद्र हगवणे यांनी केले. गावाच्या स्मशानभूमीच्या विकास व सुशोभीकरणाच्या दृष्टीने उभारण्यात आलेले हे प्रवेशद्वार सामाजिक ऐक्य व सेवाभावनेचे प्रतीक ठरले आहे.












