न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १६ मार्च २०२६) :- श्री क्षेत्र देहू येथे सृजन फाऊंडेशनचे अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल व इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी शाळेच्या प्रांगणात रोबोटिक्स, अंतराळ व तंत्रज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन वेदांत इंडस्ट्रीजचे उद्योजक दिपकभाऊ जाधव, शिवनिर्मिती इंजिनिअरिंगचे उद्योजक दिलीपभाऊ टिळेकर, एनडीए प्लास्टिकचे उद्योजक दामाजी आसबे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या उद्घाटनप्रसंगी उपस्थित पालक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना दामाजी आसबे यांनी मनात जिद्द व चिकाटी ठेवून काम केले तर आपण यश मिळवतोच असे सांगितले. नवीन कोणते शोध लावण्याऐवजी जे आहे त्यात नवीन काही शोधून काढले तरी ती नवनिर्मिती ठरते. यशाचं गमक सांगताना त्यांनी वाचनाला प्राधान्य दिले. तसेच दिलीप टिळेकर यांनी एक उपक्रमशील शाळा म्हणून शाळेचे कौतुक करत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे असे प्रतिपादन केले. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी विद्यार्थ्यांची प्रयोगशीलता व त्यांचे प्रयत्न यांचे कौतुक करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक संतोष पिसे यांनी यावेळी आपली भूमिका मांडत अपयशातून येणारी अचूकता तसेच जगामधील भारताचे स्थान याबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. तर सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे कौतुक केले.
इ. पाचवी, सहावी व सातवी तील विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, अंतराळ व तंत्रज्ञान या विषयांवरील प्रकल्प या प्रदर्शनात सादर केले. स्पेस एक्स, थ्री डी होलोग्राम, वायु गती असलेले बोट, हवेच्या दाबावर चालणारे राॅकेट, हायड्राॅलिक मिडसोल, अवकाशयान , पेरिस्कोप, रोबोटिक हात, पचन संस्था, निसार उपग्रह, स्पुतनिक, फाल्कन ९, मार्बल रन, हायड्रॉलिक पूल, वायुगतिकीय बोट, सूर्यग्रहण, स्वयंचलित पाणी वितरण यंत्र, हवेच्या दाबावर चालणारे राॅकेट अशा विविध प्रकल्पांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता. यामध्ये माहितीवजा तक्ते, कार्यरत माॅडेल्स यांचा समावेश होता. विद्यार्थी आपण बनविलेल्या प्रकल्पाबाबत सर्व माहिती आत्मविश्वासाने स्वतः स्पष्ट करुन सांगत होते व पालकांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही करत होते.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्राथमिक विभागातील पालकांनी एकच गर्दी केली होती. इ. सहावी तील श्रीशांत सुर्यवंशी व इ. सातवी तील पूर्वा काळे हे संपूर्ण प्रदर्शनात अंतराळवीर माॅडेल बनून प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले. प्रदर्शन पाहताना सर्व मान्यवर, पालक यांनी प्रकल्पाशी संबंधित प्रश्न विचारुन या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला. याप्रसंगी शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. रोबोटिक्स विभाग प्रमुख प्राप्ती सहाणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.








