न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 25 मार्च 2026) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बैठकीआधी स्विमिंग टँक टेंडरच्या मुद्द्यावरून एक नगरसेविका आणि दुसऱ्या सत्ताधारी नगरसेविकेचे पती आमने-सामने आले आणि त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महापालिकेच्या एका प्रभागामधील प्रस्तावित स्विमिंग टँकचे टेंडर देऊ नये, अशी ठाम भूमिका त्या नगरसेविकेच्या पतीने घेतली. संबंधित ठेकेदाराने पूर्वी केलेल्या कामात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत, त्या कामामुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची तक्रार त्यांनी केली. त्यामुळे त्या ठेकेदाराला पुन्हा काम देऊ नये, असा त्यांचा आक्रमक पवित्रा होता.
मात्र त्या नगरसेविकेने हा विषय मंजूर करण्याचा आग्रह धरला. यावरून वादाची ठिणगी पडली आणि पाहता पाहता त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. “तुम्ही या बैठकीत कसे?” असा सवाल उपस्थित करत वाद अधिकच चिघळला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत संताप व्यक्त केला.
वाद इतका वाढला की एकमेकांवर वैयक्तिक टीकाही करण्यात आली. अखेर संबंधित व्यक्ती संतापाच्या भरात बैठक सोडून बाहेर निघून गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
















