न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ९ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित ५० कोटींच्या आर्थिक व्यवहारावरून प्रशासन आणि स्थायी समिती आमने-सामने आले आहेत. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी लेखा विभागावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर आता लेखा विभागाने आज अधिकृत खुलासा प्रसिद्ध केला आहे.
लेखा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी झालेल्या अंदाजपत्रक विशेष सभेनंतर उपसूचना तात्काळ प्राप्त झाल्या नव्हत्या. त्यानंतर सुट्ट्या आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे २७ मार्च रोजी उपसूचनांच्या प्रती मिळाल्या. ३० मार्च रोजी नगरसदस्यांकडून प्राप्त झालेल्या उपसूचनांची छाननी करून, आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरलेल्या प्रस्तावांवर पुढील कार्यवाही करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित विभागांकडून तरतूद उपलब्ध असल्याने देयके सादर झाली आणि त्यानुसार प्रक्रिया पार पडली, असेही प्रशासनाने नमूद केले.
मात्र, दुसरीकडे बारणे यांनी या प्रक्रियेलाच संशयाच्या भोवऱ्यात ओढले आहे. त्यांनी आरोप केला की, अधिकृत बजेटमध्ये तरतूद नसताना कोट्यवधींची बिले काढण्यात आली, तसेच विभाग प्रमुखांना याची कल्पनाही देण्यात आली नाही. काही नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचा गैरवापर करून बोगस उपसूचनांच्या आधारे निधी वितरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी काय निर्णय घेतात याकडे याकडे शहराचे लक्ष लागले आहे.














