मा. संतोष जराड प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ९ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित ५० कोटींच्या आर्थिक व्यवहारावरून निर्माण झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याची घोषणा केली आहे. ही समिती सात दिवसांत आपला अहवाल सादर करणार असून, त्यानंतर पुढील कारवाई ठरवण्यात येणार आहे.
दरम्यान, संबंधित व्यवहारांबाबत ठेकेदारांना दिले जाणारे सर्व पेमेंट तात्पुरते बँकेमार्फत रोखण्यात आले असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे.
या आधी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी लेखा विभागावर गंभीर आरोप करत, अधिकृत बजेटमध्ये तरतूद नसताना कोट्यवधींची देयके काढण्यात आल्याचा दावा केला होता. काही नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचा गैरवापर करून बोगस उपसूचनांच्या आधारे निधी वितरित केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
त्याला प्रत्युत्तर देताना लेखा विभागाने उपसूचनांची प्रक्रिया नियमांनुसार पार पडल्याचे सांगितले. २४ मार्चच्या अंदाजपत्रक सभेनंतर उपसूचना उशिरा प्राप्त झाल्याने, ३० मार्च रोजी त्यांची छाननी करून योग्य प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते.
सध्या या प्रकरणामुळे महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशी समितीचा अहवाल काय निष्कर्ष देतो आणि प्रशासन काय कारवाई करते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.















