न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मरणार्थ भव्य सृष्टी उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवार, २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी येथील भीमसृष्टी परिसरात साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे २४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सृष्टीमध्ये आकर्षक प्रवेशद्वार, लँडस्केप गार्डन, डिजिटल माहिती सुविधा व आधुनिक पायाभूत सोयींचा समावेश असणार आहे.
कार्यक्रमानिमित्त सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे गीतगायन तसेच ‘मी रमाई’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.










