- चार महिला व तीन पुरुषांकडून इनोवा कारसह ७.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- वाकड परिसरातील स्टार बाझारमध्ये महागड्या खाद्यवस्तूंची चोरी करणाऱ्या सराईत टोळीला वाकड पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. या प्रकरणात चार महिला व तीन पुरुषांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली इनोवा कार व ऑटो रिक्षासह एकूण ७ लाख २१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दत्त मंदिर रोड, वाकड येथील स्टार बाझार तसेच कलाटेवस्ती येथील स्टार बाझारमध्ये १२ व २९ ऑगस्ट रोजी बदाम, काजू, तुपाचे पाऊच व अन्य खाद्यवस्तू चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. गुन्ह्यात वापरलेली इनोवा कार आणि ऑटो रिक्षा ताथवडे-वाकड परिसरात आढळल्यानंतर पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी वाकडसह पिंपरी आणि चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी काटे पिंपळे आणि वाघोली येथील स्टार बाझारमध्येही काजू, बदाम आणि तुपाचे पाऊच चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही टोळी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि राज्यातील अन्य भागांत अशाच प्रकारचे गुन्हे करत असल्याची शक्यता असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.

















