- ‘मी इथला भाई आहे’ म्हणत दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०७ सप्टेंबर २०२६) :- काळेवाडीतील नढे नगर परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कार पार्क करण्यासाठी दरमहा हप्ता देण्याची मागणी करत तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून कारच्या काचा फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अजिंक्य कॉलनी, नढे नगर, काळेवाडी येथे घडली. याबाबत पवन अशोक जैतमल (वय २९) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीचे दाजी अविनाश वाघ यांनी त्यांची स्विफ्ट डिझायर कार घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर लॉक करून पार्क केली होती. रात्री जेवण झाल्यानंतर फिर्यादी कॉलनीतील रस्त्यावर फिरत असताना आरोपी अमन मनिर शेख आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्यांना अडवले. रस्त्यावर गाडी लावायची असल्यास दरमहा दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने हातातील लोखंडी कोयता उगारून धमकावले. त्यानंतर कोयत्याने स्विफ्ट डिझायर (एमएच १४ एलबी ८०२७)च्या समोरील व पाठीमागील काचा फोडून नुकसान केल्याचा आरोप आहे. तसेच चौघांनी फिर्यादीला पकडून कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १,५०० रुपये बळजबरीने काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यावेळी आरोपींनी कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली आणि परिसरातील इतर वाहनांचेही नुकसान केल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
याप्रकरणी अमन मनिर शेख (२१), आर्यन कोरे, सौरभ पाटोळे आणि हर्षल वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अमन शेख याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.


















