- विक्रीसाठी साठवलेला लाखोंचा गांजा जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०९ सप्टेंबर २०२६) :- अमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेत तब्बल २५ किलो ८६५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे १२ लाखांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत गांजासह मोबाइल आणि इतर साहित्य असा एकूण २३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कस्पटे चौकाजवळ, पुलावर करण्यात आली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार वंदू दत्तात्रय गिरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. संशयित गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. कारवाईदरम्यान आबा मल्हारी खलाटे (४७), प्रमोद भीमराव गारुडकर (२४) आणि गोरक्षनाथ शिवाजी वाळके (२६) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २५.८६५ किलो गांजा आढळून आला.
पोलिसांनी गांजासह इतर मुद्देमाल जप्त केला असून, हा अमली पदार्थ नेमका कुठून आणण्यात आला होता आणि तो कोणाला विक्री करण्यात येणार होता, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. वाकड पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई तीव्र केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


















