- १० शाळांमधून ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १६ ऑक्टोबर २०२६) :- भोसरी येथील पांजरपोळ गोशाळेत रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ अंतर्गत २० रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय रोटरी मिलेट जत्रा व गो-विज्ञान परिषद २०२६ उत्साहात संपन्न झाली. यंदा १० शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांनी पोस्टर व सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेतला.
रोटेरियन प्रदीप खेडकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात भरडधान्यांचा प्रसार, देशी गोपालन आणि ग्रामीण-शहरी संवादावर भर देण्यात आला. मिलेट प्रभात फेरी, पाककला व पोस्टर स्पर्धा, प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, गोपूजन आणि गोसेवकांचा सन्मान असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाला प्रांतपाल रो. नितीन ढमाले, माजी प्रांतपाल रो. संतोष मराठे आणि रो. शीतल शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्पचे अध्यक्ष रो. सादिक सागर यांनी आयोजनात पुढाकार घेतला. पुणे, मुंबई, नाशिकसह विविध जिल्ह्यांतील शेतकरी, उद्योजक व गोपालक सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले आणि रो. क्रांती शहा यांनी केले.


















